छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : वाळूज औद्योगिक क्षेत्रालगतच्या उद्योगांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रियेला गती मिळत आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या अभय योजनेअंतर्गत नियमितीकरणाची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून, छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतर्फे काही उद्योजकांना नियमितीकरण प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. महानगर आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१२) उद्योजकांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे (मसिआ) अध्यक्ष गजानन देशमुख आणि उपाध्यक्ष राहुल मोगले उपस्थित होते. वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत विविध गट क्रमांकांमध्ये कार्यरत उद्योगांना जमीन वापर बदल, नियमितीकरण आणि प्रशासकीय मंजुरींसंदर्भात अनेक वर्षांपासून अडचणींना सामोरे जावे लागत होते. या प्रश्नांवर मसिआने शासन आणि प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. काही दिवसांपूर्वी मसिआ कार्यालयात विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत
उद्योजकांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत नियमितीकरणासंदर्भातील विविध शंकांचे निरसन करण्यात आले. त्यानंतर अनेक उद्योजकांनी कागदपत्रांसह अर्ज सादर करून बेटरमेंट चार्जे स भरले. त्यापैकी काही उद्योगांना आता नियमितीकरणाची अधिकृत प्रमाणपत्रे मिळाली आहेत.
बँकांकडून मिळणार कर्जसुविधा
याबाबत मसिआचे अध्यक्ष गजानन देशमुख म्हणाले की, नियमितीकरण प्रमाणपत्रांचे वितरण सुरू होणे ही औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वाची आणि सकारात्मक घडामोड आहे. यामुळे उद्योगांना कायदेशीर मान्यता मिळून विस्तार प्रकल्प, वित्तीय संस्था व बँकांकडून कर्जसुविधा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होईल.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions














